Nov 09, 2024 - by Ghar junction
71 views
कल्याण, ९ नोव्हेंबर:
कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधकांवर कठोर टीका केली. व्होट जिहादचा नारा देत जात-धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, राज्याच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या एकात्मतेसाठी भारतीय जनता पक्षाला मतदान करा.
१४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ आयोजित महिला मेळाव्यात स्मृती इराणी बोलत होत्या. त्यांनी या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचे कौतुक केले आणि त्या योजनांचा लाभ घेत देश अधिक प्रगत होत असल्याचे सांगितले.
३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील मुलींना वारसा हक्क, आदिवासींना आरक्षणाचे अधिकार, आणि मुलांचे संरक्षण करण्याचे अधिकार मिळाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “३७० कलम पुन्हा कधीच लागू होणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी विरोधकांना “रीजेक्शनचे इंजेक्शन” देण्याचे आवाहन केले.
या सभेत भाजपाच्या प्रदेश सचिव प्रिया शर्मा, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Recent comments(0)