Nov 15, 2024 - by Ghar junction
38 views
कल्याण, दि. १४ नोव्हेंबर:
शिवसेनेतर्फे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात विविध पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये कल्याण पूर्वचे शहरप्रमुख म्हणून निलेश शिंदे आणि विधानसभा प्रमुख म्हणून प्रशांत काळे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते या पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात पक्षाच्या कार्याची दिशा आणि उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली.
महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे महेश गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. यामुळे रिक्त झालेल्या कल्याण पूर्व शहरप्रमुख पदावर योग्य व्यक्तीची निवड करणे आवश्यक ठरले. विधानसभा निवडणुका अंतिम टप्प्यात असल्याने पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.
नवीन नियुक्त्यांमध्ये उप शहर प्रमुख म्हणून कृष्णा साळुंखे, उपविभाग प्रमुख म्हणून राजाराम आव्हाड, तसेच उप शाखाप्रमुखपदी संतोष गवारे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व नविन पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर या सर्वांना पक्षाच्या हितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डोंबिवलीतील सभेत उद्धव गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पालांडे, कामेश जाधव, सत्यवान खेडेकर, महेंद्र एटमे आणि अनंत आंब्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हाप्रमुख लांडगे यांनी या नवागत कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आणि त्यांना पक्षाच्या विकासप्रवण कार्यात योगदान देण्याचे आश्वासन दिले.
या नियुक्त्यांच्या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी, अरुण आशान, रमाकांत देवळेकर, मनोज चौधरी यांच्यासह माजी नगरसेविका माधुरी काळे व इतर अनेक प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Recent comments(0)