Nov 08, 2024 - by Ghar junction
81 views
डोंबिवलीकरांच्या लाडक्या "किलबिल फेस्टिवल"चे आयोजन येत्या रविवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरातील रेल्वे मैदानावर होणार आहे. हा बालदोस्तांच्या मजेचा महोत्सव यंदा आपल्या १२ व्या वर्षात पदार्पण करतोय. लहानग्यांसाठी खास खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेवर आधारित असलेल्या या फेस्टिवलमध्ये मुलांना कला, खेळ आणि विविध उपक्रमांचा आनंद घेता येईल. त्यात चित्रकला, टॅटू, आणि कॅरिकेचरसह कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी बनवणे, बोलक्या बाहुल्या, जम्पिंग मून वॉक, जादूचे प्रयोग, आणि बालनाट्य या प्रकारांचा समावेश आहे.
यावर्षी थाऊजंड हँड डान्स ग्रुपचे अद्भुत नृत्य, झिरो डिग्री डान्स आणि साहसी खेळांमध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग यांचा थरारक अनुभव मुलांना घेता येईल. जायंट पांडा, टेडी बेअर, हेडलेस मॅन, अल्लाउद्दीनचा जिन या रंगीबेरंगी पात्रांनी मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे सर्व खेळ आणि सुविधा डोंबिवलीतील बाळगोपाळांसाठी मोफत ठेवण्यात आल्या आहेत, ज्याचा लाभ घेण्यासाठी आयोजकांकडून बालदोस्तांना आवाहन करण्यात आले आहे.
Recent comments(0)