डोंबिवली एमआयडीसी रिॲक्टर स्फोट : 4 ठार तर 33 जण जखमी

May 24, 2024 - by Ghar Junction

43 views

डोंबिवली एमआयडीसी रिॲक्टर स्फोट : 4 ठार तर 33 जण जखमी
डोंबिवली एमआयडीसी रिॲक्टर स्फोट : 4 ठार तर 33 जण जखमी

डोंबिवली दि.23 मे :
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 4 जण ठार तर 33 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणाहून अग्निशमन दलाने चार जणांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे. तर डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याबाबत शासन स्तरावर नक्कीच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना एक आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. (Dombivli MIDC reactor explosion: 4 killed and 33 injured)

हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या 8 ते 10 कंपन्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यातील काही कामगारही जखमी झाले आहेत. कंपनीपासून जवळच असलेल्या कल्याण शीळ रोडवरील शोरूम्स,सोनारपाडा आणि सागाव येथील अनेक फ्लॅट्स, घरे आणि दुकानांच्या काचाही फुटल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेपर्यंत सुमारे पाच किलोमीटरच्या परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला. स्फोट नेमका कशाचा झाला?, हे काहीवेळ कुणालाच कळले नाही. भूकंप झाल्याची अफवा पसरली आणि जिवाच्या आकांताने लोक घर आणि इमारतींमधून उतरून पळू लागले. कंपनीपासून जवळ असलेल्या मानपाडा रोडवर तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या, 12 पाण्याचे टँकर, 8 ते 10 ॲम्ब्युलन्स तसेच पोलीसही दाखल झाले असून युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. जखमींना डोंबिवलीतील एम्स आणि नेपच्यून रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. स्फोटात जखमी झालेल्या 24 जणांना एम्स रुग्णालयात तर 9 जण नेपच्यून रुग्णालयात दाखल आहेत. स्फोटानंतर डोंबिवली पूर्व भागात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले.

आजचा स्फोट हा साधारणपणे एक ते दीड किलोमीटर... अंतरापर्यंत ऐकू आला. तर त्यापेक्षा लांब दूरवरून या स्फोटानंतर लागलेल्या आगीचे - धुराचे लोळ आकाशात उठल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्यामध्ये आतापर्यंत आगीमध्ये जळालेल्या चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

Recent comments(0)

Leave a comment


 8055000190

Thank You
Ok
Alert
Ok
Enquire Now
Please fill out below details